हिंजवडी, दि. २७ जून २०२६ : अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात हिंजवडी पोलिसांनी प्रभावी कारवाई करत एका संशयितास अटक केली असून त्याच्याकडून ६० ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान अमली पदार्थांसह मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, पॅकिंग साहित्य, रोख रक्कम आणि मोपेड असा एकूण १२ लाख ६६ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास मधुबन चौक ते कस्तुरी चौक मार्गावरील येळवंडे कॉम्प्लेक्ससमोर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित व्यक्ती अमली पदार्थांच्या विक्रीसाठी परिसरात फिरत असल्याचे निदर्शनास आले होते.
या प्रकरणी संदीप कुमार अजोधी प्रसाद (वय २७) याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी हा उत्तर प्रदेश राज्यातील खिरी जिल्ह्यातील कडेया गावचा रहिवासी असून सध्या आंबेगाव येथील विघ्नहर्तानगर परिसरात वास्तव्यास होता.
पोलीस शिपाई कारभारी नामदेव पालवे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८(क) व २१(ब) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी ब्राऊन शुगरची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने अमली पदार्थ बाळगत असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सपना पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अमली पदार्थांच्या साखळीतील इतर संबंधितांचा शोध घेतला जात आहे.


