परभणी, प्रतिनिधी :
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण परभणी तालुक्यातील रायपूर येथील तरुण दीपक देवराव मस्के याने घालून दिले आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील असलेल्या दीपकची भारतीय सैन्यदलात (Indian Army) निवड झाली असून, त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे रायपूर गावासह संपूर्ण परभणी जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दीपकने लहानपणापासूनच अनेक आर्थिक अडचणींचा सामना करत शिक्षणासोबत सैन्य भरतीची तयारी सुरू ठेवली. कठोर सराव, शारीरिक तंदुरुस्ती आणि अविरत मेहनतीच्या जोरावर त्याने भारतीय सैन्यदलात स्थान मिळवून आपल्या कुटुंबाचे, गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
दीपकच्या यशाबद्दल गावातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्याच्या या यशामुळे ग्रामीण भागातील अनेक युवकांना प्रेरणा मिळणार असून, देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी तो आदर्श ठरला आहे.
यावेळी रायपूर ग्रामस्थांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “कष्टाला पर्याय नसतो आणि जिद्दीसमोर कोणतीही गरिबी टिकू शकत नाही. दीपकने आपल्या अथक परिश्रमांच्या जोरावर हे सिद्ध करून दाखवले आहे. रायपूरच्या या सुपुत्राचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”
दीपक मस्केच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्याच्या पुढील सैनिकी कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.


