पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
चिंचवडमधील छत्रपती संभाजीनगर परिसरात स्वीकृत आमदार अमितभाई गोरखे यांच्या कार्यालयाजवळ एका भरधाव कारने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनाला जोरदार धडक देऊन चालक फरार झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी रात्री सुमारे १०:५० वाजण्याच्या सुमारास एका बंगल्याबाहेर पार्किंगमध्ये उभी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या टाटा नेक्सॉन EV या वाहनाला काळ्या फिल्मिंगची फॉक्सवॅगन पोलो कारने अतिवेगाने टर्न घेताना जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज मोठा झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले.
धडक दिल्यानंतर चालकाने कार रिव्हर्स घेतली. मात्र, अपघातामुळे पोलो कारचे बोनट बाहेर आले होते. तरीदेखील चालकाने त्याच अवस्थेत वाहन भरधाव वेगाने महात्मा फुले नगर – साने चौक मार्गाच्या दिशेने पळवून नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
विशेष म्हणजे, संबंधित वाहनाच्या नंबर प्लेटवरील केवळ शेवटचे चार अंक स्पष्ट दिसत होते. उर्वरित नंबर अतिशय लहान अक्षरांत असल्याने पूर्ण नंबर ओळखणे कठीण झाले.
या घटनेची माहिती निगडी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, धडक देऊन फरार झालेल्या चालकाचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे.


