मोशी, दि. ११ जुलै : मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर चौथ्या दिवशीही बचावकार्य अखंडपणे सुरू असून प्रशासन, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच विविध यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत. दुर्घटनास्थळी अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने रात्रभर काम करण्यात आले.
शुक्रवारी मध्यरात्रीपासून दुर्घटनाग्रस्त इमारतीचा धोकादायक भाग हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या कारवाईदरम्यान इमारतीचे वरचे दोन मजले यशस्वीपणे हटविण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी ही कारवाई अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली.
धोकादायक भाग हटविल्यानंतर आता बचाव पथकांनी मॅन्युअल सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. ढिगाऱ्याखाली कोणी अडकले असल्यास त्यांचा शोध घेणे, तसेच कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी अत्यंत सावधगिरीने काम सुरू आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन बचाव पथके समन्वय साधून प्रत्येक भागाची तपासणी करत आहेत.
घटनास्थळी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत. बचावकार्य अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यात येत असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शोधमोहीम पूर्ण होईपर्यंत बचावकार्य अविरत सुरू राहणार असून आवश्यक त्या सर्व यंत्रणा आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे. बचावकार्य यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.


