रानवडे कुटुंबीयांचा आरोप; संरक्षणाची मागणी
पुणे : नांदे येथील मिळकतीच्या वादातून रानवडे कुटुंबीयांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला आहे. तसेच, दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास श्री. बाबासाहेब चंद्रकांत साखरे यांनी बळजबरीने तार कंपाऊंड करून पानटपरीचे नुकसान केल्याचा आरोप तक्रारदार सौ. सुरेखा गुलाब रानवडे यांनी केला आहे. 
तक्रारीनुसार, नांदे येथील सर्व्हे नं. 31/4/4, वार्ड नं. 1, मिळकत नं. 0403 येथे पक्के घर असून त्याच्या शेजारी पानटपरी आहे. सदर पानटपरीवर रानवडे कुटुंबातील मुलाचा उदरनिर्वाह चालत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वी दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी बाबासाहेब चंद्रकांत साखरे यांनी विकास गुलाब रानवडे यांच्याविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. त्यानंतर रानवडे कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तक्रारीची प्रत किंवा संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने 7 सप्टेंबर 2026 रोजी माहितीच्या अधिकारात अर्ज करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, 11 सप्टेंबर रोजी पहाटे पानटपरीचे नुकसान करून ती सुमारे 100 फूट अंतरावर तुटलेल्या अवस्थेत फेकून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पानटपरी व त्यातील मालाचे अंदाजे ₹5 लाखांचे नुकसान झाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या पानटपरीच्या उत्पन्नातून कर्जाचा हप्ता तसेच मुलीच्या शिक्षणाचा खर्च भागविला जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे आपल्यासह संपूर्ण कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त करत, संबंधितांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करून कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी सौ. सुरेखा गुलाब रानवडे यांनी केली आहे.
मात्र, तक्रार करूनही बावधन पोलीस ठाण्याकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप रानवडे कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेणार, तसेच पानटपरीचे नुकसान व कथित बेकायदेशीर कारवाईबाबत चौकशी कधी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
— तक्रारदार : सौ. सुरेखा गुलाब रानवडे, पुणे
दिनांक : 11 सप्टेंबर 2026


